दोन बातम्या माझ्या डोक्यातून जात नाहीयत. एक आहे विश्वविक्रमी उसेन बोल्टची आणि दुसरी विनोद कांबळीची. कोण किती ग्रेट आहे आणि कोण किती नशीबवान यात मला फारसा रस नाही. पण एका व्यक्तीला कुठली गोष्ट जिंकत ठेवते आणि एका व्यक्तीकडे जिंकण्याची सर्व साम्रगी असतानाही तो पराभूत कसा काय होतो याची मला मोठी उत्सुकता आहे.
उसेन बोल्ट म्हटलं की कष्ट आणि कष्ट आणि विनोदी कांबळी म्हटलं की नशीब, नियती असे शब्द वापरले जातात. खरं तर विजेत्याला एका चौकटीत आणि पराभूत झालेल्याला दुसऱ्या चौकटीत टाकून आपण मोकळे होतो. पण म्हणून काही जय पराजयाचं भयानक वास्तव बदलत नाही. श्वास करपणं आणि श्वास श्रीमंत होणं हे त्यातलंच.
विनोद कांबळी क्रिकेटमधून निवृत्त झाला. खरं तर तो शेवटचा कधी खेळला हेच आठवणं कठीण. त्यामुळे त्याच्या निवृत्तीला महत्व शून्य. लक्षात राहिल असा तो खेळला त्याला दीड दशक उलटून गेलंय. उजवा पाय किंचितसा वर घेऊन हूक मारणार डावखुरा विनोद, डोळ्याच्या बाहुलीवर जशास तसा कोरला गेलाय. मी आता तिशीचा आहे आणि माझ्या विशीत ज्या क्रिकेटर्सच्या प्रेमात पब्लिक पागल होती त्यात कांबळी सर्वात वरचा. सचिनपेक्षाही तो अधिक भावलेला. विनोदला क्रिकेटची देणगी होतीच, याबद्दल शंकाच नाही. पण प्रॅक्टीससाठी लोकलच्या दुसऱ्या वर्गातून प्रवास करणारा विनोद अधिक जवळचा झाला. त्याच्या दिसण्यातलं “गल्ली”पण असेल किंवा त्याच्या नावातला कांबळी शब्द. त्यामुळे तो श्रीमंतांच्या क्रिकेटमध्ये “आपला” जरा लवकरच झाला. क्रिकेटवर अधिराज्य गाजवण्यासाठी खेळाची सर्वकाही देणगी मिळाली असतानाही विनोद अपयशी का ठरला?
यश आणि अपयश यात एका बाराखडीचं अंतर. “अ”. इंग्रजीत दोन. म्हणजे SUCCESS आणि UNSUCCESS मधे “UN”. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातलं यश-अपयश या एका बाराखडीत सामावलंय. पण एकाचं आयुष्य Larger than life आणि दुसऱ्याचं आयुष्य “Small things of god”
माझ्यापेक्षा तुम्ही सचिन किंवा कांबळीबद्दल अधिक वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. पण ऐकीव हे शेवटी ऐकीवच. ते वास्तवाच्या जवळ असतं पण वास्तव नसतं. त्यामुळे सचिन-कांबळीबद्दलच्या तुलनेत उणीवा राहिल्या तर त्या माझ्या. मी सचिनला भेटलेलो नाही पण कांबळीला भेटलोय. त्याच्याशी फार बोलणं झालंय असंही नाही पण काही काळ त्याचं निरीक्षण केलय. मी झी 24 तासला असतानाची गोष्ट. कांबळीचा आमच्याकडे शो होता. तो सकाळी चालायचा आणि सायंकाळीही. एक प्रसंग पुरेसा असतो महानतेची प्रचिती यायला. विनोद सकाळी लवकरच पोहोचायचा. स्टुडिओत खायला प्यायला परवानगी नसते. विनोदला त्याची किती तरी वेळेस कल्पना दिली पण तो काही बदलला नाही. अशा एक ना अनेक गोष्टी. शेवटी चॅनलनं विनोदलाच बदललं. विनोद बेशिस्त आहे का? याच बेशिस्तीनं विनोदला संपवलं का? माईक टायसनच्या कुळातला आहे विनोद?
सचिन आणि कांबळी दोघेही गाणी भरपूर ऐकायचे. दौऱ्यावर असतानाही. रात्री उशिरापर्यंत कांबळींच्या रूममध्ये आवाज यायचा. सचिनचा लवकरच थांबायचा. सचिन सकाळी प्रॅक्टीससाठी हजर असायचा तर कांबळीची दांडी. परिणाम आपल्यासमोर आहे. सचिन विक्रमादित्य तर विनोदला ओहोटी. विनोदच्या डोक्यात यशाची हवा गेली? सचिननं नवनवे विक्रम केले पण तो कायम भुकेला दिसला? विनोदची भूक लवकरच संपली? मध्यमवर्गीय मुलांना यश मिळालं की ते समाधानी होतात आणि कायमचे संपतात.
मोजता न येणारा पैसा खोऱ्यानं मिळतो. स्वप्नातल्या बायका प्रत्यक्षात अवतरतात, फार कमी मध्यमवर्गीय मुलं यातून सहीसलामत सुटतात, काही अडकतात? सचिन आणि विनोदचं वर्गीकरण या दोन्हीत करता येईल? अपयश अनाथ असतं आणि यशाला बाप अनेक. नऊ वेळेस कमबॅक करणाऱ्या विनोदलाही ही पट्टी लावता येईल?
शाहरूख खान असो की अमिर खान, हे काही शतकातले महान कलाकार नाहीत. पण आपल्या जवळ जे “एवढूसं” आहे ते कसं जपायचं आणि दाखवायचं त्याचं “एवढं” मोठं डोकं त्यांच्याकडे आहे. त्याच्या मुलाखती ऐकल्या की त्याची प्रचिती येतेच. विनोद कांबळीसारखी गुणी पोरं यात कमी पडतात का? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या पातळीएवढी यशाची लाट येतेच, पण प्रत्येकाला ती समजतेच असं नाही. ज्यांना त्या लाटेवर स्वार होता येतं ते पुढच्या लाटेत फेकले जातात तर इतर पहिल्याच लाटेत गटांगळ्या खातात. Some survive better than others. विनोदबाबतही असच घडलं असावं का? या रांगेत विनोद एकटा आहे, असं म्हणावं की तुमच्या माझ्यासारखे कित्येक जण?
बोरीस बेकर आणि स्टेफी ग्राफ हे माझे आवडते टेनिसपटू. मला टेनिस फार कळत नाही पण बेकरच्या कारकिर्दीचा विनोद झाला तर स्टेफीच्या कारकिर्दीचा सचिन. विश्वास बसत नाही की स्टेफी आणि बेकर एकत्र प्रॅक्टीस करायचे. बेकरबाबत मी आजही काही वाचलं, ऐकलं की हळवा होतो रूखरूख लागते जशी विनोदबद्दल. पण त्यांच्या पराभवाचं काय? की यशाला चौकट बिकट काही नसते? तिला नसते नियती आणि कसलीच वासना? यश हे यश असतं. ना आघाती आणि ना अपघाती ? का यश अपयशाची तुलनाच फुटकळ, जिंकणारे जिंकतात हारणारे हारतात. काहींच्या नशीबात यश आणि यशच आणि काहींच्या नशीबात पराभवाचे फेरे?
पण असं म्हणून सगळी संकटं, माणसं अंगावर घेऊन जिंकणाऱ्या आयन रँडच्या रोअर्कवर किंवा गेल वायनँडवर आपण अन्याय तर करत नाहीत ना? उसेन बोल्ट, मायकल शूमाकर, रॉजर फेडररसारखे जगज्जेते यात मोडतात का? उसेन बोल्टनं तर वीज चमकवलीय. त्याच्याबद्दल वाचताना वाटलं, साल्यासोबत आपणही पळायला पाहिजे. काय हरकत आहे. आपण शेवटून पहिले येऊ फार तर. पण बोल्टच्या सोबत स्पर्धा केली हे काय कमी आहे?
काही पराभव यशापेक्षा किती तरी मोठे असतात. खरं तर सकाळी लवकर उठणंसुद्धा मला जमत नाही. पण काही तरी वाटणं हाच तर जिवंतपणा. असमाधानी असण्याची पहिली खूण. गालिबच्या शब्दात,
हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पर दम निकले बहुत निकले मेरे अरमाँ फिर भी क्यूँ कम निकले.....
मला स्वत:ला असं वाटतं की माणूस एकदा हवं ते मिळवण्यात समाधानी झाला की तो संपला, हे बेसिक. बाकी इतर गोष्टी लढण्याच्या. अपयश येत नाही असं नाही पण “चल साले की बजाते है” म्हणण्याची हिंमत असलीच पाहिजे. तुम्हाला “गुलाल” मधला रणसा आठवतो. तो दहा वेळेस मार खातो पण अकराव्या वेळी मारण्याची हिंमत ठेवतो. तो एकदा म्हणतोही, देने गये थे, बना, पर लेने पडे पण म्हणून काही रणसाचं महत्व कमी होत नाही.
विनोदला जर निवृत्ती जाहीर करेपर्यंत असं वाटलं असेल की मिळाली संधी तर देऊ दणका तर तो ग्रेटच. तो रणसा. पण यातलं काहीच नसेल तर आयुष्य म्हणजे गाठोडं. न सुटलेलं. श्वास जड करणारं.
Tuesday, February 23, 2010
Subscribe to:
Posts (Atom)